दहावी बारावी बोर्ड परीक्षा | बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी 23 महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दरवर्षी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येत असतात. या परीक्षांसाठी बोर्डाने काही सूचना विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या आहेत. या सूचना खालीलप्रमाणे
विद्यार्थ्यांकरिता सूचना
01. परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दररोज बरोबर आणावे. पर्यवेक्षक, केंद्रसंचालक व केंद्राला भेट देणारे अधिकारी ज्या ज्या वेळी प्रवेशपत्राची व ओळखपत्राची मागणी करतील त्या प्रत्येक वेळी त्यांना ते दाखविता आले पाहिजे.
02. परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा दालनात विद्यार्थ्यांस पर्यवेक्षकांकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांक याची खात्री करून उपस्थिती-पत्रकावर (Form-1) बैठक क्र. बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करावी आणि त्यानंतर बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवर काळजीपूर्वक चिकटवावा.
03. उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठराविक रकान्यात बैठक क्रमांक अंकात व अक्षरात विनचूक लिहून सही करावी.

04. परीक्षेच्या काळात पेपर सुरू असताना परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
05. परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका मिळाल्यावर ती सुस्थितीत असल्याची व त्यात सर्व पृष्ठे असल्याची खात्री करून घ्यावी.
06. उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्रमांक 3 पासून लिहिण्यास प्रारंभ करावा.
07. उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नये. केवळ डाव्या बाजूसच समास सोडावा.
08. प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहावे. उत्तरपत्रिका किंवा पुरवणी उत्तरपत्रिकेचे कोणतेही पान फाडू नये. फाडल्यास परीक्षार्थी शिक्षेस पात्र राहील.
09. पर्यवेक्षकाकडून घेतलेली उत्तरपत्रिका व पुरवणीनंतर पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच उत्तरपत्रिकेसोबत जोडलेल्या पुरवण्यांची संख्या, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर विनचूक नोंदवावी.
10. प्रश्नपत्रिका मिळताच प्रश्नपत्रिकेच्या वरील भागावर, प्रत्येक पृष्ठावर उजव्या बाजूस स्वतःचा बैठक क्रमांक नोंदवावा.
11. कच्चे लिखाण करावयाचे झाल्यास ते पेंसिलने आणि उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पृष्ठभागावर करावयाचे. सुट्या कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करू नये. त्या पृष्ठावर कच्चे लिखाण असा स्पष्ट उल्लेख असावा.
12. संबंधित प्रश्नाचे अथवा उपप्रश्नाचे उत्तर जेथे सुरू होते तेथे समासात प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक अचूक व स्पष्ट लिहावा. यासाठी वेगळ्या शाईचा उपयोग करू नये.
13. एकाच प्रश्नाच्या वेगवेगळ्या उपप्रश्नांकरिता वेगवेगळी पृष्ठे उपयोगात आणण्याची आवश्यकता नाही.
14. परीक्षार्थ्यांनी उत्तराचा काही भाग खोडला असेल अथवा शाईत बदल करावा लागला असेल अथवा कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या / काळ्या शाईने रेषा मारली असेल अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी करू नये.
15. परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर निळ्या अथवा काळ्या शाईचा उपयोग करावा अन्यथा मजकुरास गुणदान केले जाणार नाही.
16. परीक्षार्थ्यांकडून खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव नियमांनुसार शिक्षेची कारवाई होऊ शकते.
अ) पुस्तक, नोट्स, मजकूर असलेला कागद परीक्षा दालनात आणणे.
शरीरावर, कपड्यांवर मजकूर लिहिलेला असणे.
ब) कोणत्याही परीक्षार्थ्याशी बोलणे / संपर्क साधणे / एकट्याने अथवा सामूहिक कॉपींग करणे.
क) प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अथवा उत्तरपत्रिकेतील पाने किंवा पुरवणी बाहेर नेणे.
ड) उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आदींची अदलाबदल करणे, इतरांना देणे, घेणे.
इ) केंद्र संचालक अथवा पर्यवेक्षकाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणे अथवा अन्य गैरप्रकार करणे.
17. उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय अनावश्यक मजकूर उदा. स्वतःचे नाव, पत्ता, बैठक क्रमांक, देवाचे नाव, पास करण्याची धमकी अथवा विनंती इत्यादी लिहू नये. असा मजकूर आढळून आल्यास तसेच चिन्हांकित खूण करून ओळख दर्शविण्याचे प्रयत्न केल्यास अशा परीक्षार्थ्यांची दखल घेतली जाईल.
18. परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांत आणि परीक्षा संपण्यापूर्वीच्या 10 मिनिटांत विद्यार्थ्यांस वर्गाबाहेर जाता येणार नाही.
19. प्रत्येक पेपर संपण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर इशारा घंटा होईल. त्यानंतर परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका व पुरवणीनंतर खाकी रंगाचा होलोग्राफिक स्टिकर दिलेल्या जागेवर बरोबर चिकटवावा. सदर होलोग्राफिक स्टिकर उत्तरपत्रिकेसह सर्व पुरवण्यानंतर चिकटवण्यात यावा. प्रत्येक पेपरच्या शेवटी अंतिम घंटा होईल. अंतिम घंटा होताच उत्तरे लिहिणे थांबवावे आणि मूळ उत्तरपत्रिका व पुरवण्या बरोबर बांधल्याची खात्री करावी. त्याप्रमाणे मुखपृष्ठावर एकूण पुरवण्यांची नोंद करण्यात यावी आणि पर्यवेक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत परीक्षार्थ्यांनी आपले आसन सोडू नये.
20. परीक्षार्थ्याच्या प्रवेशपत्राचा / ओळखपत्राचा दुरुपयोग जो कोणी परीक्षा काळात करील त्याचे व संबंधित विद्यार्थ्याचे वर्तन जामीन अपराध व दखलपात्र गुन्हा आहे. दोन्ही संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल.
21. विषयाच्या उत्तरपत्रिकेत स्केचपेनचा वापर करता येणार नाही. आकृतींसाठी साध्या पेन्सिलचा वापर करावा.
22. ऐनवेळी एखादा अनुत्तीर्ण विद्यार्थी एखाद्या विषयातील पूर्वी मिळालेली सूट दाखवावीची असल्यास तसे हमीपत्र केंद्रसंचालकांना परीक्षेच्या आधी द्यावे लागेल.
23. विद्यार्थ्यांना परीक्षागृहात Pocket Calculator वा तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरण वापर करता येणार नाही.
24. लॉग टेबल मंडळाने अधिकृत दिलेले वापरावे व परत करावे.
