मराठी व्याकरण : समास
जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात.
समासाचे महत्वाचे प्रकार :
(१) कर्मधारय समास
या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम यांचा समावेश होऊन एक शब्द तयार होतो. या शब्दांच्या एकीकरणाला कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा : सामासिक शब्द विग्रह
नीलकमल नील असे कमल
महाराष्ट्र महान असे राष्ट्र
नरसिंह सिंहासारखा नर
(२) द्वंद्व समास
या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्व देण्यात येतो. जेव्हा समान प्राधान्य असलेले दोन शब्द एकत्र येऊन नविन जोडशब्द तयार होतो तेव्हा त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. या समासाचे तीन प्रकार पडतात.
(१) इतरेतर द्वंद्व समास:
उदा : सामासिक शब्द विग्रह
आईवडील आई आणि वडील
रामलक्ष्मण राम आणि लक्ष्मण
(२) वैकल्पिक द्वंद्व समास:
उदा : सामासिक शब्द विग्रह
खरेखोटे खरे किंवा खोटे
बरे वाईट बरे किंवा वाईट
(३) समाहार द्वंद्व समास:
उदा : सामासिक शब्द विग्रह
गप्पा गोष्टी गप्पा, गोष्टी वगैरे
मीठ भाकर मीठ, भाकर वगैरे
(३) द्विगू समास
या समासामध्ये पहिले पद हे संख्याविशेषण असते. म्हणुनच या समासाला द्विगू समास म्हणतात.
उदा : सामासिक शब्द विग्रह
नवरात्र नऊ रात्रींचा समूह
चौकोन चार कोनांचा समूह
सरावासाठी प्रश्न
(१) पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा:
i) दसदिशा – ii) मातृभूमी –
iii) दहाबारा – iv) भीमार्जुन –
उत्तरे –
i) दसदिशा – द्विगू समास
ii) मातृभूमी – कर्मधारय समास
iii) दहाबारा – वैकल्पिक द्वंद्व समास
iv) भीमार्जुन – इतरेतर द्वंद्व समास
(२) विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा
i) वसतीसाठी गृह – ii) खाणेपिणे वैगरे –
iii) बाप आणि लेक – iv) धर्म किंवा अधर्म –
उत्तरे –
i) वसतीसाठी गृह – वसतिगृह
ii) खाणेपिणे वगैरे – खाणेपिणे
iii) बाप आणि लेक – बापलेक
iv) धर्म किंवा अधर्म – धर्माधर्म
(३) सामासिक शब्दांचा विग्रह करा
i) घनश्याम ii) महादेव
iii) गुरेवासरे iv) विटीदांडू
उत्तरे –
i) घनश्याम – घनासारखा श्यामल
ii) महादेव – महान असा देव
iii) गुरेवासरे – गुरेवासरे वगैरे
iv) विटीदांडू – विटी आणि दांडू
(४) योग्य जोड्या लावा
सामासिक शब्द | समासाचे नाव |
१) ऊनपाऊस | द्विगू समास |
२) सप्तस्वर्ग | वैकल्पिक द्वंद्व समास |
३) बरेवाईट | कर्मधारय समास |
४) पितांबर | इतरेतर द्वंद्व |
उत्तर –
- ऊनपाऊस – इतरेतर द्वंद्व
- सप्तस्वर्ग – द्विगू समास
- बरेवाईट – वैकल्पिक द्वंद्व समास
- पितांबर – कर्मधारय समास
(५) तक्ता पूर्ण करा
सामासिक शब्द | विग्रह | समास |
१) पूर्वपश्चिम | —————— | —————— |
२) पालापाचोळा | —————— | —————— |
३) सप्तपदी | —————— | —————— |
४) दहाबारा | —————— | —————— |
उत्तर –
सामासिक शब्द | विग्रह | समास |
१) पूर्वपश्चिम | पूर्व आणि पश्चिम | इतरेतर द्वंद्व समास |
२) पालापाचोळा | पाला, पाचोळा वगैरे | समाहार द्वंद्व समास |
३) सप्तपदी | सात पावलांचा समूह | द्विगू समास |
४) दहाबारा | दहा किंवा बारा | वैकल्पिक द्वंद्व समास |