नमस्कार मित्रांनो दहावीइयत्तेच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर तासिका सुरु कराव्यात यासाठी आपण मा. मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. हे तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो.
दहावी मराठी माध्यमासाठी सह्याद्री वर तासिका सुरु करा | मुख्यमंत्र्यांना पत्र | #SupportMarathiMedium
दिनांक : १८ मार्च २०२१
प्रति,
मा. मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र राज्य
विषय: सह्याद्री या मराठी वाहिनीवर इयत्ता दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी तासिका सुरु करण्याची विनंती करण्याबाबत.
अर्जदार: महेंद्र दशरथ घारे (खोपोली- रायगड)
महोदय,
मी श्री.महेद्र दशरथ घारे एका सामाजिक संस्थेत कार्यरत असलेला नागरिक म्हणून हे पत्र आपणास लिहित आहे. शिवाय Creative Math Marathi हा माझा शैक्षणिक YouTube channel सुद्धा चालवित आहे. आजच्या कोरोना काळात सर्वच क्षेत्रांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रावरही अनेक प्रतिकूल परिणाम घडून आले. महाराष्ट्र बोर्डाकडून या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु झाले. यात काहीच शंका नाही. येत्या 23 एप्रिल पासून बारावी आणि 29 एप्रिल पासून दहावी इयत्तेची बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्ड आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने सह्याद्री या मराठी वाहिनीवर दहावी आणि बारावी इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी तासिका सुरु आहेत. हा चांगला उपक्रम आहे याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन. परंतु एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने सांगावीशी वाटते की या तासिकांमध्ये दहावी इयत्तेचा विचार केला तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी काहीच नाही असे दिसते. सर्व तासिका या इंग्रजी माध्यमांच्या वर्गांसाठी असल्याच्या दिसतात.
सोबत मी वर्षभरात बोर्डाकडून घेतल्या गेलेल्या सर्व झालेल्या सर्व तासिकांच्या वेळापत्रकांच्या PDF जोडत आहेत. हे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र च्या संकेतस्थळावरसुद्धा आपण पाहू शकता. खरतर महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठी. पण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय की काय अशी चर्चा मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये होताना दिसत आहे. या तासिकांची खरी गरज मराठी माध्यमांना होती. कारण मराठी शाळेचा विद्यार्थी हा खेड्यात राहणारा जिथं online शिक्षण खूप दुर्मिळ होतं. उलट जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात त्यांची संख्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर सह्याद्री वाहिनीवर किमान गणित इंग्रजी आणि विज्ञान यांसारख्या मुलांना अवघड वाटणाऱ्या विषयांच्या तासिका बोर्डाने सुरु कराव्यात ही नम्र विनंती. सध्या वेळ खूप कमी आहे याची आम्हालाही जाणीव आहे. त्यामुळे जरी जास्तीत जास्त धड्यांच्या तासिका नाही घेता आल्या तरी निदान गणित, विज्ञान, इंग्रजी यांसारख्या विषयांचा अभ्यास कसा करावा? यावर मराठीतून काही चर्चासत्रे व्हावीत ही नम्र विनंती.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र च्या संकेतस्थळावर असलेले वेळापत्रक पहिले तर असे दिसून येते की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी काहीच तासिका झाल्या नाहीत. झाल्या असतील किंवा पुढे अशा तासिका करण्याचे नियोजन जरी असेल तरी तसे बोर्डाकडून कळवले जावे ही विनंती.
महारष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण या महत्वाच्या शैक्षणिक मुद्याचा विचार करावा अशी मी सर्व महराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून आपणांस विनंती करतो.
आपला विश्वासू
महेंद्र दशरथ घारे
खोपोली
प्रत 1 – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
प्रत 2 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
प्रत 3 – मा. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड madam
प्रत 4 – मा. उप मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब