प्रकरण 1 ले – इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
प्रकरण 1 ले – इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा Notes
स्वाध्याय
प्रश्न 1 ला . (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
(१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ……….. यास म्हणता येईल.
(अ) व्हॉल्टेअर
(ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके
(ड) कार्ल मार्क्स
उत्तर – (अ) व्हॉल्टेअर
(२) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ………. याने लिहिला.
(अ) कार्ल मार्क्स
(ब) मायकेल फुको
(क) लुसिआँ फेबर
(ड) व्हॉल्टेअर
उत्तर – (ब) मायकेल फुको
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल – रिझन इन हिस्टरी
(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके – द थिअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी
(३) हिरोडोटस – द हिस्टरीज्
(४) कार्ल मार्क्स – डिसकोर्स ऑन द मेथड
उत्तर – कार्ल मार्क्स – दास कॅपिटल
प्रश्न २ रा. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) द्वंद्ववाद
1) हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ; खरे-खोटे, चांगले-वाईट. या पद्धतीला ‘द्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्) असे म्हटले जाते.
2) या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धान्तांच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धान्ताची समन्वयात्मक मांडणी केली जाते.
(२) ॲनल्स प्रणाली
1) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली. अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
2) इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले.
प्रश्न ३ रा : पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
1) स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला.
2) त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशाधेन सुरू झाले.
3) १९९० नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो.
(२) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
1) इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन फुको याने केले.
2) पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले.
3) फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले.
४. पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) इतिहासलेखन म्हणजे काय?
1) इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, हे आपण पाहिले.
2) अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.
(२) रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला?
1) इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता.
2) ‘एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये’ हा नियम त्याने आपल्या ‘डिस्कोर्स ऑन द मेथड’ या ग्रंथात मांडला होता.
(३) व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते?
1) व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला.
2) त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता येईल.
५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
1) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली.
2) इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात.
3) समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी कार्ल मार्क्स याने केली.
(२) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती?
आधुनिक इतिहासलेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात : (१) ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
(२) हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही.
(३) या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते.
(४) मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.
(३) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
1) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना.
2) सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला.
3) त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशाधेन सुरू झाले.
(४) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
1) लिओपॉल्ड व्हॉन रांके याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले.
2) मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
3) इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला.