शाळा, महाविद्यालये बंद – शिक्षणावर काय गंभीर परिणाम होत आहेत
शाळा, महाविद्यालये बंद – शिक्षणावर काय गंभीर परिणाम होत आहेत
गेल्या दोन वर्षात मुले शाळेपासून दूर राहिली. मुलांनी फक्त ऑनलाईन शिक्षण घेतले. पण नेमकं हे शिक्षण कोणाला किती मिळाले? समाजातील सर्व स्तरापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचले काय? याचा आढावा सरकारने कधी घेतला काय? ग्रामीण असो वा शहरी कोणत्याही भागात, ज्या मुलांकडे मोबाईल किंवा इतर ऑनलाईन शिक्षणाची साधने होती त्या मुलांना ऑनलाईन तासिकांना हजर रहाता आले. पण ज्यांच्या कडे ही साधने उपलब्ध नव्हती त्याचं काय? या मुद्द्यावर कधी कोणी बोलताना दिसलं नाही. NCERT च्या अवह्वालानुसार 27% मुलांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधने नाहीत. (At least 27% students don’t have access to smartphones, laptops for online classes: NCERT survey (nationalheraldindia.com) शाळा बंद झाल्यावर ही मुले तर शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणारच ना? बर उरलेल्या 73% मुलांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्याची साधने जरी असली तरी नेट किंवा इतर अनेक तांत्रिक अडचणी आहेतच.
याशिवाय शिकवत असताना वापरण्यात येणाऱ्या पद्धती, शिक्षकांकडे असणारे तांत्रिक ज्ञान या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सुरु असणाऱ्या पारंपारिक शिक्षण पद्धतींमुळे आपल्याकडे ऑनलाईन शिक्षण देत असताना शिक्षकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली. यात शिक्षकांचा सुद्धा काही दोष नसावा कारण ऑनलाईन शिक्षण सुरु करा असे आदेश देणाऱ्या सरकारने आणि शिक्षण मंडळाने शिक्षकांच्या क्षमता वाढवण्याचा खुपसा प्रयत्न केलेला दिसत नाही.
मुले प्रत्यक्षात वर्गात शिकत असताना शिक्षकाला प्रत्येक मुलाकडे नजर टाकता येते. त्या मुलाच्या भावना शिक्षकांना टिपता येतात. वर्गात लक्ष नसणाऱ्या मुलाला प्रश्न विचारून त्याला पुन्हा वर्गात लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करता येते. परंतु ऑनलाईन शिक्षणात मुलांच्या भावनांचं, मुलांच्या वर्तनाचं निरीक्षण करण्यास शिक्षकांना मर्यादा येतात. या दोन वर्षात मुलांच्या वाचनाचा आणि लिहिण्याचा वेग मंदावला आहे हे बोर्डाने सुद्धा अप्रत्यक्षरीत्या कबूल केले आहे. म्हणूनच यावर्षी बोर्ड परीक्षेत पेपर लिहिण्याचा कालावधी 3 तासांऐवजी साडेतीन तासांचा दिला आहे. गणित विषयात मुलांना बेरीज वजाबाकी पासून अडचणी यायला सुरुवात झाली आहे. विज्ञान विषयाचा तर कित्येक संकल्पना मुलांना समजल्याच नाहीत. गणित आणि विज्ञान हे विषय प्रात्यक्षिकातून शिकवण्याचे विषय आहेत हे विषय ऑनलाईन शिकवताना खूप अडचणी येतात. तसेच मुलांमध्ये चिडचीड पणा ताणताणाव वाढत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे येणाऱ्या काही वर्षात अनेक मुलांना डोळ्यांच्य समस्येला सुद्धा सामोरे जावे लागणार आहे.
मुलांना शैक्षणिक दृष्ट्या अपंग करायचे नसेल आणि भारताचे भविष्य सुकर करायचे असेल तर शाळा महाविद्यालये बंद न करता कोरोनाचे नियम पाळून 50% क्षमतेने किंवा दोन शिफ्ट मध्ये वर्ग भरवणे गरजेचे आहे. याचबरोबर सर्व मुलांचे लसीकारण लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडेही लक्ष द्यायला हवे.
महेंद्र दशरथ घारे