राजा राममोहन रॉय | Raja Rammohan Roy | 1772 – 1833
राजा राममोहन रॉय | Raja Rammohan Roy | 1772 – 1833
भारतातील धर्मसुधारणेचे आणि समाजसुधारणेचे आद्यप्रवर्तक तसेच ‘आधुनिक भारताचा निर्माता’ या उपाधीने ज्यांना गौरविले जाते असे व्यक्तिमत्व म्हणजे ‘राजा राममोहन रॉय’
धर्माच्या नावाखाली भारतीय समाज अंधश्रद्धेच्या दरीत खेचला जात होता. अधोगती कडे वाटचाल करत असलेल्या भारतीय समाजाला नव्या विचारांचा मंत्र देणाऱ्या राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्यात झाला. त्यांच्या गावाचे नाव होते ‘राधानगर’. त्यांच्या वडिलांचे नाव रमाकांत रॉय होते. रमाकांत रॉय हे एक सधन आणि प्रतिष्टीत जमीनदार होते. मुर्शिदाबादच्या नवाबाच्या दरबारात त्यांही काही काळ काम केलं होतं. मुस्लीम दरबारात अरबी आणि फारसी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे अरबी आणि फारसी भाषेचे महत्व रमाकांत रॉय यांनी ओळखले आणि राममोहन रॉय यांना लहानपणीच या दोन भाषा अवगत कशा होतील याकडे विशेष लक्ष दिले. या भाषा शिकण्यासाठी विशेष शिक्षणाची व्यवस्था केली. पुढे शिक्षणासाठी पाटणा येथे गेले असता पाटणामध्ये त्यांनी इस्लाम धर्म, इतिहास आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास केला. बनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषा शिकून घेतली. याचबरोबर इंग्रजी, फ्रेंच, हिब्रू, ग्रीक यांसारख्या भाषांवर सुद्धा त्यांनी प्रभुत्व मिळवले.
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी हिंदू धर्मातील मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला. मुर्तीपुजेवर टीका करणारी एक पुस्तिका देखील त्यांनी काढली. १८०३ मध्ये यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पुढे १८०५ मध्ये राममोहन रॉय यांनी इस्ट इंडिया कंपनी मध्ये दिवाण म्हणून नोकरी धरली. १८०९ मध्ये शिरस्तेदार म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. पुढे त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला आणि कोलकाता येथे आले.
१८१५ साली राममोहन रॉय यांनी ‘आत्मीय सभेची स्थापना केली. पुढे १८१८ मध्ये अतिशय अनिष्ट अशा सतीच्या प्रथेला विरोध केला. ‘शाश्त्राच्या संमतीने केलेला खून’ अशा परखड शब्दांत सतीच्या प्रथेवर राममोहन रॉय यांनी टीका केली. ही प्रथा कायद्याने बंद करावी म्हणून इंग्रज सरकारचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पुढे ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत झाला.
२० ऑगस्ट १८२८ रोजी त्यांनी ‘ब्राम्हो समाज’ या संघटनेची स्थापना केली. पुढे १९ नोव्हेंबर १८३० रोजी दिल्लीच्या मोगल बादशाहने आपल्या वार्षिक पेन्शनमध्ये वाढ करण्यासंबंधी ब्रिटीश सरकारला विनंती करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून राममोहन रॉय यांना इंग्लंडला पाठवले. इंग्लंडला जाण्याआधी व=बादशाहने त्यांना ‘राजा’ ही पदवी बहाल केली.
राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ब्राम्हो समाजाची प्रमुख तत्वे पुढीप्रमाणे आहेत.
(१) ईश्वर एकच असून तो निराकार आहे; म्हणून सर्वांनी त्या निराकार ईश्वराची उपासना करावी.
(२) ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. आपण सर्व मानव एकमेकांचे बंधू आहोत; म्हणून सर्वांनी परस्परांशी बंधुभावाच्या नात्याने वर्तन करावे.
(३) जगातील सर्व धर्मांचे अंतरंग सारखेच आहे; म्हणून प्रत्येक व्यक्तीने सर्वच धर्माचा व धर्मापंथांचा आदर करावा.
(४) मूर्तिपूजा हा ईश्वरभक्तीचा त्याज्य मार्ग होय; म्हणून कोणत्याही स्वरूपात मूर्तिपूजा करू नये. त्याऐवजी सामुदायिक ध्यानसाधनेच्या मागनि ईश्वराची अंतःकरणपूर्वक प्रार्थना करावी.
(५) व्यक्तीने प्रपंचास परमार्थरूप मानून चालावे.
(६) प्रेम, सेवा व परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ होय, असे समजून सर्वांनी परस्परांशी व्यवहार करावा