न्यायाधीशाने सुनावली अजबच सजा | डोळ्यांतून पाणी आणणारी घटना
न्यायाधीशाने सुनावली अजबच सजा | डोळ्यांतून पाणी आणणारी घटना
काही दिवसापूर्वी एका मराठी वृत्तपत्रात ही घटना ऐकली होती. अमेरिकेतील न्यायालयातील ही सुनावणी होती. अमेरिकेतील एका 15 वर्षाच्या मुलाला एका दुकानातून काही वस्तू चोरताना पकडण्यात होते. सुरक्षारक्षकाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याचा धक्का शेल्फला लागला आणि ते पडून आणखी नुकसान झाले होते.
न्यायाधीशांनी सगळे ऐकून घेतल्यावर त्यांनी मुलाला विचारले, तू खरोखरच ब्रेडचे पाकीट आणि चीज चोरलेस. तो मुलगा मान खाली घालून म्हणाला ‘होय.’ न्यायधीशांनी विचारलं, “का चोरलंस?”
मुलगा म्हणाला, “साहेब मला त्याची गरज होती.
पुढे न्यायाधीश म्हणाले, “तू ते विकत घेवू शकला असतास.”
मुलगा म्हणाला, “माझ्याकडे पैसे नव्हते.”
न्यायधीश पुन्हा म्हणाले, “तू आईवडिलांकडून मागून घ्यायचेस.”
मुलगा बोलतो, “माझ्या घरात फक्त आई आहे. ती आजारी असते. काही काम करू शकत नाही. तिच्यासाठी ब्रेड आणि चीज चोरले होते.
न्यायाधीश, “ तू काही काम का करत नाहीस?”
मुलगा, “ मी लोकांच्या मोटारी धुण्याचे काम करायचो. एके दिवशी आईच्या आजारपणामुळे जाऊ शकलो नाही आणि माझे काम गेले.
न्यायाधीश, “तू कुणाकडे मदत का मागितली नाहीस?”
मुलगा, “सकाळीच घरातून बाहेर पडलो होतो. जवळपास ५० व्यक्तींना भेटून त्यांच्याकडून मदत मागितली. पण शेवटी मला हे पाऊल उचलाव लागलं. कारण मला कोणीच मदत केली नाही.”
जेव्हा युक्तिवाद संपला तेव्हा न्यायाधिशाने निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली.
‘चोरी आणि विशेषतः ब्रेडची चोरी करावी लागणे, हि अतिशय लाजिरवाणी घटना आहे. या गुन्ह्यासाठी आपण सगळेच जबाबदार आहोत. न्यायालयात उपस्थित असलेले सगळे. अगदी मी देखील. त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला दहा डॉलर दंड ठोठावण्यात येत आहे. दंड भरल्याशिवाय इथून कुणीही बाहेर जाणार नाही.’
न्यायाधीशांनी स्वतःच्या खिशातून दहा डॉलर काढले. त्याचबरोबर ते निकालपत्र लिहू लागले.
‘भुकेलेल्या मुलाला पोलिसांच्या हवाली केल्याबद्दल त्या दुकानदाराला एक हजार डॉलर चा दंड ठोठावत आहे. 24 तासांत दंड भरला नाही तर दुकान सील करण्यात येईल.’
ही सगळी रक्कम त्या मुलाला देवून न्यायालयाने त्या मुलाची माफी मागितली.
निकाल ऐकल्यानंतर उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मुलगा पुन्हा पुन्हा न्यायाधीशांकडे पाहत होता. डोळ्यांतील अश्रू लपवत न्यायाधीश उठले आणि त्यांच्या दालनात गेले.
आपला समाज यंत्रणा आणि न्यायालय असा निर्णय देवू शकते काय?
चाणक्याने लिहून ठेवले आहे, जेव्हा एखादी भुकेली व्यक्ती भाकरीसाठी चोरी करताना सापडते तेव्हा त्याबद्दल देशातील लोकांना लाज वाटली पाहिजे.