व्यक्तिपरिचय – डॉ. मनमोहनसिंग – Dr. Manmohan Singh
व्यक्तिपरिचय – डॉ. मनमोहनसिंग – Dr. Manmohan Singh
डॉ. मनमोहनसिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होत, अशी त्यांची ओळख करून देणे हे त्यांनी जपलेली मूल्ये लक्षात घेता त्यांच्यावर काहीसे अन्याय करणारे ठरेल. भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेला पहिला अर्थतज्ज्ञ या शब्दांत त्यांची ओळख करून देणे अधिक सयुक्तिक ठरेल- त्यांच्या व्यक्तिमत्त्वास न्याय देणारेही ठरेल! डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पंजाबमधील गाह या खेड्यात झाला. त्यांचे शिक्षण पंजाब, केंब्रीज व ऑक्सफर्ड या विद्यापीठांमध्ये झाले. १९५६ मध्ये त्यांना केंब्रीज विद्यापीठाचे प्रतिष्ठेचे ‘अॅडम स्मिथ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
सन १९६३-६५ च्या दरम्यान पंजाब विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राचे अध्यापन केले. १९६९-७१ या दरम्यान त्यांनी दिल्ली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापार हा विषय शिकविला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून काम केले. सन १९७१ मध्ये डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. सन १९७२-७६ या दरम्यान त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिले. १९७६-८२ या कालखंडात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे संचालक, भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक, आशियाई विकास बँकेचे भारतीय गव्हर्नर, नियोजन आयोगाचे सदस्य-सचिव यांसारख्या पदांवर काम केले. १९८२-८५ या कालखंडात त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद भूषविले. सन १९८५-८७ या कालखंडात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. काही काळ ते विद्यापीठ अनुदान आयोगाचेही
अध्यक्ष होते. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधानपदी आल्यानंतर राष्ट्रीय आणि जागतिक अर्थकारणाचा प्रदीर्घ आणि सखोल अभ्यास असलेल्या या अर्थतज्ज्ञाकडे त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपद सोपविले. त्यांची अर्थमंत्रिपदाची कारकीर्द अतिशय यशस्वी ठरली. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सन १९९१ मध्ये भारताने उदार आर्थिक धोरणाचा आणि पर्यायाने जागतिकीकरणाचा अवलंब केला. त्यांनी अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था अतिशय ढासळलेली होती- पत खालावलेली होती. तथापि, त्यांच्या कारकिर्दीत भारतास जगातील एक आर्थिक सत्ता म्हणून स्थान प्राप्त झाले. आपल्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीत डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या मुत्सद्देगिरीची परिसीमा गाठीत अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार संपन्न केला, पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकांत काँग्रेसला बहुमताजवळ नेण्यात त्यांच्या मृदू, मितभाषी व स्वच्छ प्रतिमेचा मोठा वाटा आहे. २२ मे, २००९ पासून ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवीत आहेत.
ReplyForward |