प्रजासत्ताक दिन भाषण | प्रजासत्ताक दिन निबंध

प्रजासत्ताक दिन भाषण | प्रजासत्ताक दिन निबंध
दिल से सलामी इस तिरंगे को,
जीससे हमारी शान है |
सर हमेशा उंचा रखना इसका,
जब तक आप मे जान है ||

सुमारे दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य टिकण्यासाठी, देशाची प्रगती योग्य मार्गाने चालण्यासाठी एका सक्षम राज्यघटनेची गरज देशाला होती. या सक्षम घटनेसोबत देश घटनेप्रमाणे चालणेही गरजेचे होते. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिश्रमातून देशाची राज्यघटना तयारी झाली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी या घटनेचा स्वीकार करण्यात आला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे घटना अमंलात आली. या राज्यघटनेनुसार देश चालू राहिला आणि याच दिवसाला आपण ‘प्रजासत्ताक दिन’ किंवा ‘गणराज्य दिन’ म्हणतो.
देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा प्रवास हा काही सोप्पा नव्हता परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावरही देशाच्या प्रवासही कठीण होता. अनेक प्रश्न देशासमोर तोंड वासून होते. बेरोजगारी, उद्योगधंदे, शिक्षण या सर्व क्षेत्रात समस्यांनी डोकं वर काढायला सुरुवात केली होती. त्यातल्या त्यात देशाला स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी भारत पाकिस्तान असे दोन देश बनवले. या विभाजनाने हिंदू मुस्लीम दंगल उसळल्या होत्या. यातून लाखो हिंदू आणि मुस्लीम नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. रक्ताचे जणू पाट सीमेवरून वाहत होते. सुरुवातीलाच म्हणजे १९४८ मध्ये भारत पाकिस्तान युद्धामुळे देशाचे वातावरण अधिक तापले होते. पुढे १९६२ मध्ये भारत चीन युद्धही झाले.
देशाने लोकशाही स्वकारली. १९५१ – ५२ साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. एवढ्या मोठ्या देशात पहिल्यांदा निवडणूक घेणे हे खूपच अवघड आणि अश्यक्यप्राय होते. परंतु या निवडणुका सुरळीत पार पडल्या. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. १९९० च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM Machine) वापरण्यात येऊ लागले. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. इव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत दयायचे नसेल तर वरीलपैकी कोणी नाही (None Of The Above-NOTA) हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले. पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली. विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. तसेच निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागले.
पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते. आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते व त्यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली. मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ वीस लाख मतपेट्या तयार केल्या गेल्या आणि त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिकटवली गेली. ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत ठरवण्यात आली. त्यामुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले.
हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी भारताचे पहिले मतदार ठरले. २५ ऑक्टोबर १९५१ रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्वकाळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री-पुरुषाला २१ वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय २१ वरून १८ वर्षे इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामळे बदलले आहे.
निवडणुकांनंतर भारताचे पहिले पंतप्रधान बनले पंडित जवाहरलाल नेहरू. यांच्या मृत्यूनंतर लालबहाद्दूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान झाले आणि भारत पाकिस्तान युद्धादरम्यान ‘जय जवान, जय किसान’ चा नारा त्यांनी दिला. भारताने या युद्धात पाकिस्तानला हरवले परंतु ताश्कंद येथे लालबहाद्दूर शास्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि पंतप्रधान पदाची माल इंदिरा गांधी यांच्या गळ्यात पडली. यांच्या काळात बैकांचे राष्ट्रीयकरण झाले, पूर्व पाकिस्तान चा बंगला देश झाला. गरिबी हटाव असा नारा त्यांनी दिला होता. पुढे देशाने १९९१ मध्ये राष्ट्रीयीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेने गती घेतली ती आजपर्यंत.