गणिताची गाणी
सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज
चला बँकेमध्ये जाऊ, थोडे थोडे कर्ज घेऊ ,
सरळव्याजाने पैसे काढू …
सरळव्याजाने नाय दिले, तर काळजी नको करू ,
चक्रवाढ व्याज वापरू…
सरळव्याज वापरत असताना, मुद्दल-मुदत लक्षात ठेवताना
व्याजाचा दर तू ओळख ना, नंतरच व्यवहार कर ना…
इथे दरवर्षाला मुद्दल एकच असताना,
नको आता काळजी तू करू….
सरळव्याजाने नाय दिले, तर काळजी नको करू
चक्रवाढ व्याज वापरू…
चक्रवाढ व्याज काढत असताना, रास काढायचा विचार करताना
सूत्रात किंमती टाकताना, डोक्याला खुराक देताना
इथे रासेच्या मधून, मुद्दल वजा सगळी करू
व्याज असे आपण काढू…..
सरळव्याजाने नाय दिले, तर काळजी नको करू
चक्रवाढ व्याज वापरू… – महेंद्र घारे (चाल: ही चाल तुरु तुरु )
दोन आणि दोन चार
दोन अन दोन चार, चार दुणे आठ
गणिताच्या गावाची धरली मी वाट || धृ |
गणिताच्या जंगलातून जाताना ग बाई
घेतली मी हातांमध्ये सूत्रांची शिदोरी
नियम गुणधर्म आणि संकल्पनांची
मशाल हाती घेऊन शोधली मी वाट || १ ||
आलेख काढताना अडचणी येतील
संभाव्यता जेव्हा माझ्या डोक्यावरून जाईल
डोळे बंद करुनी विचार मी करीन
शिक्षकांची थोडी घेईन मी साथ || २ ||
– महेंद्र घारे [ चाल : झाल्या तिन्ही सांजा ]
निवडून देऊ गणिती सरकार
गणित बेरीज वजाबाकी अन करू भागाकर
निवडून देऊ आता गणिती सरकार
चिन्ह असती समान होती क्रिया बेरीज
असती चिन्ह भिन्न तर होते वजाबाकी
चिन्हांचा हा गोंधळ आता नाहीच होणार
निवडून देऊ आता गणिती सरकार
गुणाकार करताना लक्षात तुम्ही ठेवा
समान चिन्ह असताना अधिक चा रे मेवा
चिन्ह असतील भिन्न
उत्तर वजा मध्ये येणार
निवडून देऊ आता गणिती सरकार
भागाकाराची रे किमया गुणकारासारखी
क्रियांचा पसारा वेगळा, पण चिन्ह सारखी
समजून घेऊ आता चिन्हांचा भडिमार
निवडून देऊ आता गणिती सरकार
- महेंद्र घारे (चाल: अंजनीच्या सुता)
आलेख
आलेख आहे हा मज प्यारा, एक्स आणि वाय चा पसारा |
चरण इथे आहेत चार , धन आणि ऋण चा मारा |
पहिले चरण घेऊन येते, धन आणि धन चे बहाणे |
दुसऱ्या चरणामध्ये येतात, ऋण आणि धन हे शहाणे ||
कित्ती सोप्पा आहे आलेख, यात आहेत फक्त चार चरणे |
आलेख आहे हा मज प्यारा, एक्स आणि वाय चा पसारा || 1 ||
तिसऱ्या चरणामध्ये येतात, ऋण आणि ऋण हे मेहुणे |
चौथे चरण घेऊन येते, धन आणि ऋण हे पाहुणे ||
कित्ती सोप्पा आहे आलेख, यात आहेत फक्त चार चरणे |
आलेख आहे हा मज प्यारा, एक्स आणि वाय चा पसारा || 2 ||
- महेंद्र घारे [ चाल : मेरे सामने वाली खिडकी में ]
त्रिकोण
ज्याला आहेत तीन कोन, असा तो त्रिकोण
सांगा पाहू यांचे प्रकार ऐकणार कोण कोण ?
काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान
याचा एक कोण असतो काटकोन, म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण
आता पाहू आपण सारे लघुकोन त्रिकोण, प्रत्येक कोण ज्याचा 0-90 च्या दरम्यान
पण 90 पेक्षा मोठा ज्याचा आहे एक कोन, त्याला आपण म्हणतो विशालकोन त्रिकोण
ज्याच्या सगळ्या बाजू असतात समान, त्यालाच म्हणतात रे समभुज त्रिकोण
समभुज त्रिकोणाचे कोन पण समान, माप प्रत्येक कोनाचे साठ अंशमान
ज्याच्या फक्त दोन बाजू आहेत समान, तोच आहे आपला समद्विभुज त्रिकोण
पण ज्याच्या नसतात सगळ्या बाजू रे समान, त्यालाच आपण म्हणतो विषमभुज त्रिकोण
असा कित्ती छान आहे आपला त्रिकोण, सांगा पाहू याचे प्रकार ऐकणार कोण कोण ?
- महेंद्र घारे [चाल : सावन का महिना पावन करे शोर]