परीक्षा नसत्या तर – मराठी निबंध
परीक्षा नसत्या तर – मराठी निबंध
वर्ष 2020 कोरोना विषाणूचा काळ. मार्च महिन्यात अचानक सर्वच वर्तमानपत्रांमध्ये एकच बातमी ठळकपणे दिसत होती. कोरोना विषाणूचा प्रर्दुर्भाव वाढत असल्याने परीक्षा रद्द होण्याची शक्यता. आम्ही पहिलीपासून आजपर्यंत कितीतरी वेळा हा फक्त निबंधच लिहिला होता परीक्षा रद्द झाल्या तर. परंतु आता खरच या परीक्षा रद्दच होण्याची वेळ आली होती. कित्येक वर्षांपासून लिहित असलेला हा निबंध आज खरा ठरण्याची वेळ आली होती. अनेक विद्यार्थ्यांचं जणू स्वप्नच असाव हे की परीक्षा रद्द व्हाव्यात आणि हे स्वप्न आज पूर्ण होणार होतं. शेवटी परीक्षा रद्द झाल्याच.
मग माझ्या मनात एक विचार आला की परीक्षा आहेत म्हणून रद्द झाल्या परंतु शाळेत कधीच परीक्षा नाही घेतली गेली तर म्हणजे शाळेत परीक्षाच नसत्या तर…? हा विचार मनात घोळू लागला. परीक्षा नसत्या तर काय काय होईल याचा विचार मी करू लागलो.
आज शाळेतील अनेक मुले खूप ताणतणावामध्ये असतात याच एकमेव कारण म्हणजे परीक्षा. परीक्षांची भीती मुलांना खूपच वाटते. माझा तर अभ्यासच झाला नाही? पेपर कसा जाईल? मी पास होईल काय? गणित विषयात मार्क पडतील काय? नापास झालो तर घरचे काय बोलतील? कमी मार्क पडले तर पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल काय? अशा अनेक प्रश्नांनी अनेक मुलांचे डोके जड होते. मुले जणू परीक्षेला घाबरतात. परंतु काही मुले अशीही असतात की त्यांना परीक्षा हव्याहव्याश्या वाटतात. त्यांना परीक्षा आवडतात.
परीक्षा नसत्या तर अनेक मुलांच्या डोक्यावरचा ताण कमी झाला असता. कोणीही नापास झालं नसत. सगळे पास होऊन पुढच्या वर्गात गेले असते. शिक्षकांना सुद्धा पेपर तपासायचं टेन्शन नसत. ना निकाल बनवण्याचं टेन्शन. त्यांची उन्हाळ्याची सुट्टी पण मजेत गेली असती. सगळं कस आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे…
वरची एक बाजू झाली की परीक्षा नसत्या तर… परंतु याची दुसरी बाजू पण नंतर माझ्या लक्षात आली. परीक्षा नसत्या तर कुठल्या मुलाची प्रगती किती झाली हे कस कळणार? खूप सारी मुलं परीक्षा नसल्यामुळे आळशी होण्याची शक्यता आहे. हुशार मुले सुद्धा अशामुळे अभ्यास सोडून देतील. आजचे युग हे स्पर्धेचे आहे त्यामुळे आपली मुले पुढील आयुष्यातील स्पर्धेत टिकाव धरणार नाहीत. आपल्या अनेक मुलाचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा झाल्याच पाहिजे असं पण आता वाटू लागलं…
शेवटी असं म्हणेल की परीक्षा असायलाच हव्या. परंतु या परीक्षांचे स्वरूप बदलायला हवे. परीक्षा सर्वाना हवीहवीशी वाटावी अशी असायला हवी. प्रत्येक मुलाच व्यवस्थित मूल्यमापन परीक्षेच्या माध्यमातून व्हावं असं वाटतय…