महत्मा गांधी | Mahatma Gandhi
महत्मा गांधी | Mahatma Gandhi
देशात अनेक थोर नेते होऊन गेले. ज्यांनी देशासाठी खूप मोलाचे कार्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी आपले योगदान दिलेले आहे. त्यांचे हे योगदान कार्य आणि बलिदान आपल्याला आजही स्मरणात आहे. अशा महापुरुषांच्या यादीत महात्मा गांधी यांचे नाव मोठ्या अभिमानाने आपण घेतो. महात्मा गांधी आपल्या देशातच नव्हे तर साऱ्या जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे असून गुजरात राज्यातील पोरबंदर या शहरात त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. गांधीजी लहानपानासासून अतिशय हळवे होते. देशभरातील हिंसा, जातिभेद, वर्णभेद आणि दंगेधोपे यामुळे गांधीजी खूप करुणामय झाले.
गांधीजींचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे झाले. नंतर इंग्लंडमध्ये राहून त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. काही काळ ते आफ्रिकेत राहिले. आफ्रिकेत महात्मा गांधी तेथील वर्णभेदावर लढत राहिले आणि यात त्यांनी मोठे यश संपादन केले. भारतात आल्यावर ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध लढले. त्यासाठी त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसा ही दोन हत्यारे वापरली. गांधीजीचे राजकीय गुरु भारतसेवक ससंस्थाप गोपाळ कृष्ण गोखले हे होते.
गांधीजींनी आपले आयुष्य साबरमती आश्रमात व्यतित केले. पत्नी कस्तुरबा यांचा गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा होता. गांधीजी नेहमी स्वदेशी कपडे वापरत. ते खादीचा पुरस्कार करत. त्यासाठी ते स्वतः चरख्यावर सूत कातत. त्यासाठी त्यांनी ‘चरखा’ घरोघरी पोहचवला. आश्रमात राहून त्यांनी सर्वांना स्वावलंबनाचे धडे दिले. स्वतःचे काम स्वतः करण्यात कसली लाज ? असा त्यांचा सवाल असे.
आपल्या देशातील गरीब आणि दलित लोकांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. स्वकीयांना अंगभर वस्त्रेही मिळत नव्हती हे पाहून गांधीजी साधे धोतर व अंगावर पंचा अशी वस्त्रे वापरत. खादीप्रसार आणि ग्रामसुधार याविषयी त्यांनी सतत पाठपुरावा केला. आपला भारत देश खेड्यांचा देश आहे. ८०% लोक खेड्यात रहातात. त्यामुळे देशाचा विकास साधायचा असेल तर ‘खेड्यांकडे चला’ असा त्यांचा संदेश होता. लोक त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणत. स्वातंत्र्यानंतर त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले गेले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते तनमनाने लढले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येक देशवासी स्वातंत्र्याचा हा सोहळा उपभोगत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी एका माथेफिरुने त्यांची हत्या केली. संपूर्ण देश दुःख सागरात बुडुन गेला. देशभर शोककळा पसरली. गांधीजी हे सत्य, अहिंसा, प्रेम आणि मानवतावाद यांचे पुजारी होते.