लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे | Lokshahir Anna Bhau Sathe
(तुकाराम भाऊ साठे)
जन्म – १ ऑगस्ट १९२०
मृत्यू – १८ जुलै १९६९
मानवतावादी विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे, तसेच लोकशाहीर, लेखक, कादंबरीकार, नाटककार म्हणून ओळखले जाणारे अण्णा भाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कामकऱ्याच्या हातावर तरली आहे.’ असे स्पष्ट विचार त्यांनी मांडले.
घरी अठराविश्व दारिद्र्य होते. हे दारिद्र्य दूर करण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांचे वडील मुंबईत मजुरीला आले. ‘माणूस शिक्षणामुळेच मोठा होऊ शकतो.’ हे मुंबईत कामाला आल्यावर अण्णांच्या वडिलांना समजले. आपल्या मुलानेही शिक्षण घ्यायला हवे. यासाठी त्यांनी आपल्या मुलाला मुंबईत बोलावून घेतले. वयाच्या दहाव्या वर्षी अण्णा भाऊ साठे शाळेत दाखल झाले. या काळात अस्पृशतेच्या दुर्दैवी प्रथेने कळस गाठला होता. पहिल्याच दिवशी अस्पृश्य असल्यामुळे त्यांना वर्गाच्या बाहेर व्हरांड्यात बसवण्यात आले. यामुळे दीड दिवसांतच अण्णांची शाळा सुटली ती कायमचीच. शिक्षण घेता आले नसले तरीही त्यांनी पुढे अनेक लावण्या, पोवाडे, कथा, कादंबऱ्या लिहिल्या.
लहान वयातच अण्णा मुंबईत आले होते. त्यामुळे लहानपणीच त्यांचा कामगार जीवनाशी जवळून परिचय झाला होता. कामगारांचे मोर्चे, संप आणि आंदोलने यांच्या दर्शनातून अण्णा भाऊ साठे यांच्या मनात कामगार चळवळी विषयी आकर्षण निर्माण होऊ लागले. यातून लहान वयातच त्यांनी कामगार चळवळीत भाग घेतला. या कामगार चळवळीत सहभागी झाल्यामुळे शाळेत न जाता आलेले अण्णा भाऊ साठे इथे मात्र लिहायला आणि वाचायला शिकले. एक चांगले कलावंत असलेले अण्णा भाऊ साठे पुढे मुंबईत सुद्धा एक उत्तम तमाशा कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले. कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्यामुळे अण्णा पुढे राजकारणातही सक्रीय झाले आणि त्यांच्यातील कलेचा पक्षाच्या प्रचारात मोठा फायदा होऊ लागला.
पुढे १९४४ मध्ये शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णा भाऊ साठे यांनी मिळून ‘लाल बावटा’ या कलापथकाची स्थापना केली. पुढे या कलापथकाने राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जनजागृतीचे मोठे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर ‘लाल बावटा’ कलापथकाने संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले. मराठी जनतेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होण्यास प्रवृत्त केले. गोवामुक्ती आंदोलनातही ‘लाल बावटा’ ने आपली कमाल दाखवली.
लहानपणापासून आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांना अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लिखाणातून मांडले. आपल्या कथा कादंबऱ्यांतून त्यांनी साकारलेल अनुभवविश्व हे खूपच परिणामकारक ठरले. त्यांच्या लेखनातून मराठी वाचकांना एक नवी अनुभूती मिळाली. फकीरा, वैजयंता, अलगुज, चित्रा यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या याचबरोबर कृष्णाकाठच्या कथा, बरबाद्या कंजारी, गजाआड हे त्यांचे कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. माझी मुंबई, अकलेची गोष्ट पेंग्याच लगीन ही वगनाट्ये सुद्धा त्यांनी लिहिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली माझी मैना गावाकडे राहिली ही लावणी संयुक्त महराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणागीत ठरले. ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ या गीतात संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा दडली आहे. फक्त दीड दिवस शाळेत जाणारे अण्णा भाऊ साठे यांची लेखणी आयुष्यभर परिवर्तनाचा ध्यास घेत होती.