लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख)
लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख) | Gopal Hari Deshmukh
लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांच्या पिढीतील एक अग्रेसर आणि महत्वाचे विचारवंत आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. १८ फेब्रुवारी, १८२३ रोजी पुणे येथे लोकहितवादी यांचा जन्म झाला. अवघ्या तेरा वर्षाचे असतानाच यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यमुळे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही पूर्णपणे त्यांच्यावर आणि त्यांच्या थोरल्या भावावर आली. लहानपणी एवढे मोठे संकट ओढवले असताना, कुटुंबाची जबाबदारी डोक्यावर असतानाही लोकहितवादी यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. वयाच्या अठराव्या वर्षी इंग्रजी शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय करून ते पुन्हा शाळेत जाऊ लागले आणि तीन वर्षांतच तेथील अभ्यासक्रम पूर्ण केला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर लोकहितवादी यांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला. सन १८६१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘हिंदू धर्मशास्त्राचे सार’ तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली होती. सन १८७७ मध्ये दिल्ली दरबार प्रसंगी ब्रिटिश शासनाने ‘रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांना सन्मानितही केले होते. सन १८७९ मध्ये ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले, लोकहितवादींची १८८० मध्ये मुंबई इलाख्याच्या सरकारने मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सभासद म्हणूनही त्यांनी काम केले.
लोकहितवादी लहानपणापासूनच अतिशय कर्तबगार, करारी आणि कुशाग्र बुद्धीचे होते. तसेच ते श्रेष्ठ साहित्यिकही होते. ते विद्वान तर होतेच; पण विद्वत्तेच्या जोडीला समाजसुधारणेसंबंधीची तळमळदेखील त्यांच्याजवळ होती. साहजिकच, विविध विषयांवरील आपली मते त्यांनी निर्भीडपणे आपल्या लेखणीद्वारे व्यक्त केली होती.
लोकहितवादींचा लेखनविस्तार खूप मोठा आहे. सन १८४८ मध्ये त्यांनी भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर’ या साप्ताहिकात ‘लोकहितवादी’ या नावाने लेख लिहिण्यास प्रारंभ केला. सन १८४८ ते १८५० या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जी ‘शतपत्रे’ लिहिली त्यावरून त्यांचा पुरीगामी दृष्टिकोन, समाजहिता-विषयीची कळकळ, विद्वत्ता इत्यादी गोष्टींची कल्पना येऊ शकते
लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्याबद्दल आग्रह धरला होता. ते. समाजसुधारणेचा ध्यास घेतलेले दुष्टे विचारवंत होते. आपल्या समाजातील अनिष्ट रूखी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार करावा, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा, असे त्यांनी म्हटले होते.
भारतीय समाजातील जातिव्यवस्था या समाजाच्या अधोगतीस कारणीभूत झाली आहे, असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी जातिव्यवस्था व वर्णभेद यांस विरोध केला होता.
भारतीय समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवरही लोकहितवादींनी जोरदार हल्ला चढविला होता. स्त्रियांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी पुरोगामी तत्त्वांचा आग्रह धरला आणि त्यांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे असे सांगितले, बालविवाहामुळे स्त्रीचे व्यक्तिमत्त्व खुरटून जाते, अनेक स्त्रियांना वैधव्याचे दुःख भोगावे लागते. म्हणून बालविवाहाची प्रथा बंद करावी, स्त्रियांना शिक्षण व विवाह यांबाबतीत स्वातंत्र्य द्यावे, विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार द्यावा, असे विचार त्यांनी मांडले होते.
लोकहितवादी यांचे विचार अतिशय प्रगल्भ होते. त्यांनी लेखनही खूप केले आहे. राजस्थानचा इतिहास, भरतखंड पर्व, भिक्षुक, पृथ्वीराज चव्हाण याचा इतिहास, लंकेचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, शतपत्रे, निबंधसंग्रह, ऐतिहासिक गोष्टी, कलियुग, स्वाध्याय, आश्वलायन गृह्यसूत्र, पानिपतची लढाई यांसारखी अनेक ग्रंथसंपदा त्यांनी लिहून काढली.
९ ऑक्टोबर, १८९२ रोजी त्यांचा मृत्यू झाला