गोदावरी परुळेकर | Godavari Parulekar
गोदावरी परुळेकर | Godavari Parulekar
स्वातंत्र्य पूर्व काळापासून महाराष्ट्रातील आदिवासी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या गोदावरी परुळेकर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९०७ साली झाला. पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातींचे प्रश्न सोडवण्यासाठी गोदावरी परुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. प्रगत समाजातील जमीनदार, सावकार, व्यापारी, सरकारी नोकरदार या घटकाकडून आदिवासी अशिक्षित आणि भोळ्याभाबड्या वारली समाजातील लोकांना लुबाडले जात होते. त्यांचे मोठे शोषण या घटकांकडून होत होते. दिवसरात्र आदिवासी समाजाला वेठ्बिगारीला लावले जात. कितीही काबाडकष्ट केले तरी आदिवासी बांधवाना उपाशी राहण्याची वेळ येत. त्यांचा कोणी वाली उरला नव्हता. अशा वारली समाजाचा विकास व्हावा या अनुषंगाने गोदावरी परुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. गोदावरी परुळेकर वाराल्यांचा विकास व्हावा म्हणून स्वतः वाराल्यांच्यात जाऊन राहत होत्या. त्यांचे दु:ख आणि समस्या समजून घेत होत्या.
कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाचा गंध नसलेल्या, वर्षानुवर्षे अशिक्षित असलेल्या या समाजाला एकत्र आणण्याचे काम गोदावरी परुळेकर यांनी सुरु केले. लोकांच्यात राहून आधी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्यांना संघटनाचे महत्व पटवून दिले. अन्यायाविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध प्रतिकार करण्याचे बळ त्यांच्यात निर्माण केले. वाराल्यांच्या प्रत्येक पाड्याला भेट देवून त्या त्यांच्यापैकी एक झाल्या होत्या.
आदिवासी समाजात कार्य करत असताना त्यांना अनेक चागले वाईट अनुभव आले. या अनुभवांचे रुपांतर त्यांनी एका ग्रंथात केले. हा ग्रंथ म्हणजे, ‘जेव्हा माणूस जागा होतो.’ याच ग्रंथाला १९७२ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. वारल्यांचे सामाजिक, आर्थिक जीवन, त्यांचे अज्ञान आणि या अज्ञानामुळे त्यांना लुबाडणारे सावकार आणि जमीनदार, वारल्यांचे कष्ट यांसारख्या अनेक मुद्द्यांवर या ग्रंथात त्यांची चर्चा केली आहे.
गरीब आदिवासी लोकं लग्नसाठी अनेक जमीनदार आणि सावकारांकडून कर्ज घेत. हे कर्ज न फेडता आल्यामुळे त्याला आणि त्याच्या पत्नीला सावकाराकडे वेठबिगारीला जावे लागत. येथे यांना खूप राबवले जात. आयुष्यभर काबाडकष्ट करूनही हे कर्ज फेडले जात नसत. या प्रथेला ‘लग्नगड्याची प्रथा’ असे म्हंटले जात. कधी कधी पतीला दूर गावात आणि त्याच्या पत्नीला शेतावर किंवा सावकाराच्या वाड्यावर कामाला ठेवले जात. येथे स्त्रीकडे एक वस्तू म्हणून बघितले जात असत. गोदावरी परुळेकर यांनी या अमानुष प्रथेला विरोध करून ही प्रथा मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
गोदावरी परुळेकर यांनी कामगार आणि शेतकरी चळवळीत देखील सहभाग घेतला होता. भाताच्या साम्यवादी चळवळीतील एक निष्टावंत कार्यकर्ता म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. गोदावरी परुळेकर यांचा मृत्यू ८ ऑक्टोबर १९९६ साली झाला.