डॉ. मनमोहनसिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होत, अशी त्यांची ओळख करून देणे हे त्यांनी जपलेली मूल्ये लक्षात घेता त्यांच्यावर काहीसे अन्याय करणारे ठरला भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेला पहिला अर्थतज्ज्ञ’ या शब्दांत त्यांची ओळख करून देणे अधिक सयुक्तिक ठरेल- त्यांच्या व्यक्तिमत्त्वास न्याय देणारेही ठरेल!
डॉ. मनमोहन सिंह | महत्वाची माहिती
डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पंजाबमधील गाह या खेड्यात झाला. त्यांचे शिक्षण पंजाब, केंब्रीज व ऑक्सफर्ड या विद्यापीठांमध्ये झाले. १९५६ मध्ये त्यांना केंब्रीज विद्यापीठाचे प्रतिष्ठेचे ‘अॅडम स्मिथ पारितोषिक’ प्रदान करण्यात आले.
सन १९६३-६५ च्या दरम्यान पंजाब विद्यापीठात त्यांनी ‘अर्थशास्त्रा’चे अध्यापन केले. १९६९-७१ या दरम्यान त्यांनी दिल्ली विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय व्यापार’ हा विषय शिकविला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून काम केले.
सन १९७१ मध्ये डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. सन १९७२-७६ या दरम्यान त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिले. १९७६-८२ या कालखंडात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे संचालक, भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक, आशियाई विकास बँकेचे भारतीय गव्हर्नर, नियोजन आयोगाचे सदस्य-सचिव यांसारख्या पदांवर काम केले. १९८२-८५ या कालखंडात त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद भूषविले. सन १९८५-८७ या कालखंडात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. काही काळ ते विद्यापीठ अनुदान आयोगाचेही अध्यक्ष होते. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधानपदी आल्यानंतर राष्ट्रीय आणि जागतिक अर्थकारणाचा प्रदीर्घ आणि सखोल अभ्यास असलेल्या या अर्थतज्ज्ञाकडे त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपद सोपविले. त्यांची अर्थमंत्रिपदाची कारकीर्द अतिशय यशस्वी ठरली. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सन १९९१ मध्ये भारताने उदार आर्थिक धोरणाचा आणि पर्यायाने जागतिकीकरणाचा अवलंब केला. त्यांनी अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था अतिशय ढासळलेली होती- पत खालावलेली होती. तथापि, त्यांच्या कारकिर्दीत भारतास जगातील एक आर्थिक संत्ता म्हणून स्थान प्राप्त झाले.
सन १९८७ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मान प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. जगातील सर्वोत्तम अर्थमंत्र्यास मिळणाऱ्या ‘युरोमनी पुरस्कारा’ने त्यांना १९९३ मध्ये गौरविण्यात आले. १९९३ व १९९४ या दोन्ही वर्षी सर्वोत्तम आशियाई अर्थमंत्री म्हणून ‘आशियामनी पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित केले गेले. एकूण बारा विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट्स प्रदान केल्या आहेत.
मार्च, १९९८ पासून राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
‘इंडियाज् एक्स्पोर्ट ट्रेण्डस् अॅण्ड प्रॉस्पेक्टस् फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथ’ (१९६४) या ग्रंथाचे ते कर्ते होत.