इयत्ता दहावी | इतिहास व राज्यशास्त्र | स्वध्याय

इयत्ता दहावी | इतिहास व राज्यशास्त्र | स्वध्याय
खालील बटानांवर क्लिक करून तुम्ही इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या सर्व प्रकरणांच्या स्वाध्यायाच्या PDF डाउनलोड करू शकता.
इतिहास

२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) द्वंद्ववाद
उत्तर: (1) हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ; खरे-खोटे, चांगले-वाईट. या पद्धतीला ‘द्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्) असे म्हटले जाते.
(2) या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धान्तांच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धान्ताची समन्वयात्मक मांडणी केली जाते.
(२) अॅनल्स प्रणाली
(1) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली. अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
(2) इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले.
(3) अॅनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
उत्तर : (१) इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
(२) त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
(३) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
(४) सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
(२) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
उत्तर : (१) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
(२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते.
(३) भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
(४) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ असे म्हटले आहे.
४. पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) इतिहासलेखन म्हणजे काय ?
उत्तर: (1) इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते, अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.
(2) अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.
(२) रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला ?
उत्तर : फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात पुढील मताचा आग्रह धरला –
(१) एखादी गोष्ट सत्य आहे, असे निःसंशयरीत्या निश्चित होत नाही, तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये.
(२) एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे.
(३) आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत.
(४) इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे.
(३) व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते ?
उत्तर : व्हॉल्टेअरच्या मते,
(१) इतिहासलेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहासलेखकाने लक्ष केंद्रित करू नये.
(२) त्याबरोबरच तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचारही होणे आवश्यक आहे.
(३) या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला.
म्हणून व्हॉल्टेअर याला ‘आधुनिक इतिहासलेखनाचे जनक’ असे म्हटले जाते.