येई हो विठ्ठले

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।।
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ. ।।
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ।।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।।
येई हो विठ्ठले माझे माऊली ये..
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।।
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ।।
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ..
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ।।
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ।।
येई हो विठ्ठले माझे माऊली ये..