नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आपणा सर्वांना अभ्यास करताना अनेक अडचणी येत राहतात. अभ्यास कसा करावा? अभ्यासाचे नियोजन कसे करावे असे अनेक प्रश्न नेहमी आपल्यासमोर पडत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत.
- अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार करा.
मित्रांनो अभ्यासाचे योग्य असे वेळापत्रक सर्वात आधी आपण तयार करायला हवे. हे वेळापत्रक वास्तववादी असावे. म्हणजे तुम्हाला त्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणे सोप्पे जाईल. आपल्याला झेपेल असे वेळापत्रक बनवणे आणि त्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करणे हि सगळ्यात पहिली टिप्स आहे.
- अभ्यास करण्यामागचा दृष्टीकोन
मित्रांनो आपण अभ्यास का करतो? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तुमचा अभ्यास करण्यामागचा दृष्टीकोन. जर तुम्ही परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी अभ्यास करणार तर तुम्हाला अभ्यास करणे थोडं जड जाईल. थोडा त्रास होवू शकतो, संकल्पना समजून घेताना. परंतु कुतूहलापोटी किंवा मला काहीतरी नवीन शिकायचं. मला समजून घ्यायचं. असा दृष्टीकोन तुमच्या डोळ्यासमोर असेल तर मात्र तुमचा अभ्यास उत्तम होईल.
- आपल्या अभ्यासाच्या नोट्स आपणच काढाव्यात.
मित्रांनो अभ्यास करताना आपण वाचनावर अधिक भर द्यायला हवाय. वाचताना महत्वाच्या शब्दांना शक्यतो अंडरलाईन करा. वाचता वाचता जे मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात ते एका वहीत लिहून काढा. बरीच मुले गाईड चा वापर करतात. परंतु आपण स्वतः नोट्स काढल्या तर त्या सध्या आणि सोप्या भाषेत असतील आणि आपल्या नोट्स आपल्या उत्तम प्रकारे लक्षातही राहतील. पाठ करायची जास्त गरजच भासणार नाही.
- वेळोवेळी उजळणी करणे
हा चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. कारण आपली उजळणी आणि सराव नसेल तर आपण अभ्यास कालांतराने विसरून जावू कारण आपला मेंदू बऱ्याच गोष्टी कालांतराने विसरत असतो. म्हणून आठवड्याभरात आपण काय काय शिकलो याचा एक आढावा घेणे गरजेचे आहे. तसेच दर महिन्यालाही आपण आपल्या अभ्यासाची उजळणी घ्यायला काही हरकत नाही.
- अभ्यासाच्या खोलीत तक्ते / अभ्यासाच्या जागेवर तक्ते लावणे
आपल्या अभ्यासक्रमातील महत्वाच्या सूत्रांचे, संकल्पनांचे, आकृत्यांचे तक्ते आपण आपल्या अभ्यासाच्या खोलीत लावू शकतो. जेणेकरून आपल्या डोळ्यांसमोर त्या सर्व संकल्पना नेहमी राहतील.
- प्रश्नपत्रिका सराव
प्रश्नपत्रिका सराव हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण आपला अभ्यास किती झाला यापेक्षा तो पेपर मध्ये किती उतरला हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आपण आपला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पुरेश्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवायला हव्यात.