दहावी बारावी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन?
गेल्या अनेक दिवसांपासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या संदर्भात पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. राज्यात कोरोनाचा प्रर्दुर्भाव वाढत असल्याने परीक्षा ऑनलाईन होतील की काय अशी चर्चा मध्यंतरी सुरु होती. परंतु यावर बोर्डाकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावी या वर्गांतील असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता बोर्डाची परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता खूप धूसर दिसत आहे.
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. यासंदर्भात संभाव्य तारखा मागील महिन्यातच बोर्डाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. या संभाव्य तारखानुसार दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या काळात होण्याची शक्यता आहे.
इयता दहावी आणि बारावीमधील विद्यार्थी संख्या जवळपास ३० लाखापेक्षा जास्त आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही यात खूप जास्त आहे. यामुळे बोर्डाची परीक्षा घेणे सोयीस्कर नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या शाळेलाच केंद्र बनवण्याची शक्यता अधिक आहे.
यावर राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले की, “दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य होणार नाही. परीक्षेला अजूनही दोन महिने बाकी आहे. त्यामुळे आता आपण काही निर्णय घेण्यापेक्षा पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा असेल याचा आढावा घेऊन आपण निर्णय घेऊ.”