मराठी निबंध | आत्मकथन | पुस्तकाचे मनोगत
मराठी निबंध | आत्मकथन | पुस्तकाचे मनोगत
आज खूप दिवसातून शाळेच्या वाचनालयात आलो होतो. वाचनालयात तशी खूप शांतता. गर्दीही कमीच होती. हल्ली मुले वाचनालयात खूप कमीच येतात. शाळेतील सर्व शिक्षकांची सुद्धा हीच तक्रार आहे. मी पण आज खूप दिवसांनंतर वाचनालयाची पायरी चढली होती. दिवाळीच्या सुट्टीत वाचायला एखादे पुस्तक वाचायला मिळते काय हे बघत होतो आणि अचानक आवाज आला. मला घेऊन चल ना सोबत. आजूबाजूला बघतोय तर कोणीच नव्हत. पण पुन्हा आवाज आला सहज पाहिलं तर चक्क माझ्या हातात जे पुस्तक होतं त्या पुस्तकातून आवाज येत होता. साक्षात पुस्तक बोलायला लागलं होतं –
“अरे मित्रा खरंच तुला विनंती करतोय की मला घेऊन चल. तू खूप पुस्तकं चाळलीस अजून तुला कुठलंच नाही आवडलं. पण मी नक्कीच आवडेल तुला. खूप कंटाळा आलाय येथे. गेली पाच वर्षे अशीच धूळ खात मी इथेच पडून आहे. माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी तुला नक्कीच सांगेल त्या साऱ्या गोष्टी आणि तुला आवडेलही या साऱ्या गोष्टी.”
“एवढा वेळ तू ऐकतोय तर तुला अजून खूप काही सांगावस वाटतय. माझ्या बद्दल आणि माझ्या सर्व मित्रांबद्दल. आज आम्ही इथं खितपत पडलोय. पण एक काळ असा होता कि आम्ही आम्ही एका जागेवर कधीच नसायचो. कोणी न कोणी आम्हाला वाचायला घेऊन जायचं. आमची पाने फाटायची पण खूप बरं वाटायचं तेव्हा. पण आता पाने फाटत नाहीत तर जशी होती तशीच राहतात एकदम कडक म्हणतो न तशी. कारण कोणी वाचतच नाही पुस्तकं. संगणक, मोबाईल आणि त्यामध्ये असलेल्या इंटरनेट वर आता सर्व माहिती तुम्हाला मिळते. मग तुम्ही का याल आमच्याकडे. पण मित्र एक सांगतो. इंटरनेट वर तुम्हाला माहिती मिळेल पण, खरं ज्ञान मात्र तुम्हाला माझ्यातून म्हणजे पुस्तकातूनच मिळेल”
“आमचा प्रवास तसा खूपच मोठा असतो. एक लेखक खूप विचार करून कथा वहीवर लिहितो. तिला फुलवतो. कथेची कधी कादंबरी बनते. मग तो अनेक प्रकाशकांच्या पायऱ्या झिजवतो. नंतर खूप प्रयत्नांनी एखादा प्रकाशक मिळतो. वहीतले शब्द छापखान्यात छापून पुस्तकात कैद होतात. मग ही पुस्तके दुकानात येतात. आणि दुकानातच खूप दिवस पडून राहतात. मी सुद्धा असाच एका दुकानात पडून राहिलो होतो. तेव्हा तुमच्या शाळेतील शिक्षक या दुकानात आले आणि मला आणि माझ्या बरोबर खूप माझ्या मित्रांना विकत घेतले. दुकानदार तर खूप खुश झाला पण त्या दुकानदारापेक्षा आम्ही सगळ्यात जास्त आनंदी होतो. आता शाळेच्या वाचनालयात जाऊ तिथे शाळेतील मुलांना आपल्यात दडलेले ज्ञान वाटू… पण हा आनंद फार काळ नाही टिकला. वाचनालयात आल्यावरही आम्ही इथेच खूप दिवस पडून राहिलो”
“पण मित्रा आता तू मला हातात घेतले आहेस. आता मला घेऊन जा इथून आणि माझ्यात कैद झालेल्या गोष्टींना समजून घे”