मराठी निबंध : माझी शाळा
मराठी निबंध : माझी शाळा
सकाळी सकाळी, लवकर उठून, तयार होऊन निघतो आम्ही. आमचा प्रवास, मार्ग आणि सगळ्या वाटा अशा ठिकाणी आम्हाला रोज पोहचवतात, जे ठिकाण आम्हाला प्रेरणा देते, माया देते, प्रेम, आत्मविश्वास जिव्हाळा आणि जगण्याची नवी उम्मेद देते. ते ठिकाण म्हणजे आमची शाळा. जी शाळा लाविते मजला लळा. एवढा लळा लावणारी आमची शाळा असूनही गायन स्पर्धेत आमचे काही विद्यार्थी गीत गातात,
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?
पण तरीही या शाळेला एक दिवस जरी सुट्टी असली की खूप कंटाळा येतो आम्हाला. शनिवारी शाळा सुटली की सोमवार कधी येतो असंच नेहमी आम्हाला वाटत असतं. कारण आमच्या शाळेची गंमतच वेगळी आहे. आमच्या बाई एकदम मस्त हसत खेळत शिकवतात. मारत तर अजिबात नाही. जास्तच दंगा केला तर कधी कधी ओरडतात. पण त्यांच्या ओरडण्यात सुद्धा खूप प्रेम असते हे नक्कीच. आमच्या वर्गातल्या सर्व मुलांची चांगली मैत्री आहे एकमेकांसोब. जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा आम्ही सर्व मस्त गप्पा मारत, दंगा करत जेवत असतो. त्यातल्या त्यात जर एखादा ऑफ तास मिळाला की मज्जा काही वेगळीच असते. आम्ही अंताक्षरी खेळतो, गाणी म्हणतो अशा तासाला. अशी मज्जा असते आमच्या शाळेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला आमच्या शाळेत वर्षागीत स्पर्धा असतात. या स्पर्धेत पावसावरची गाणी सदर करावी लागतात आणि वर्षाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा असतात. या दोन स्पर्धांच्या मधल्या काळात प्रत्येक महिन्यात वेगवेगळी स्पर्धा असते. नाटक, निबंध, रांगोळी, चित्रकला यांसारख्या अनेक स्पर्धा वर्षभरात होत असतात. या स्पर्धांमध्ये शाळेतील जास्तीत जास्त मुले दरवर्षी सहभागी होत असतात. आमच्या बाई म्हणतात, “शाळेमध्ये ज्या विविध स्पर्धा होत असतात. या स्पर्धांमध्ये आपण सर्वांनी नेहमी सहभागी व्हायचं. कारण या स्पर्धांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपला व्यक्तिमत्व विकास होत असतो. पुस्तकांच्या बाहेरच जग या स्पर्धांमधून आपल्याला अभ्यासायला मिळत.”
अशा आमच्या शाळेत आम्हाला ज्ञान मिळत आणि या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे विविध स्पर्धांच्या माध्यमातून शिकवलं जात म्हणून मला माझी शाळा खूप आवडते.