रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टीच होती. मी आणि माझे चार-पाच मित्र आम्ही शाळेजवळील चाळीतच राहायचो. त्यामुळे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही सार्वजन शाळेच्या कुंपणावरून उडी मारून शाळेच्या मैदानावरच क्रिकेट खेळायला जायचो. हा रविवार पण असाच होता. आमच क्रिकेट खेळून झालं होतं. खेळून खूप दमलो होतो. म्हणून आम्ही शाळेच्या बंद असलेल्या दरवाजाजवळील पायऱ्यांवर गप्पा मारत बसलो. अचानक एक आवाज आला. “काय विद्यार्थी मित्रांनो, दमलात कि काय?” आम्ही इकडे-तिकडे पाहू लागलो. कोण आवाज देतंय आम्हाला? पण कोणी दिसेनाच. मग पुन्हा आवाज आला. ‘अरे मी शाळा बोलतेय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं.’ आम्ही आश्चर्यचकित होऊन ऐकू लागलो आणि पुढे शाळा आमच्याशी संवाद साधू लागली.
मराठी निबंध : शाळा बोलू लागली तर…! Marathi essay – shala bolu lagali tar
‘हो विद्यार्थी मित्रांनो,खरंच मी शाळा बोलते. तुमची शाळा. दररोज सकाळी १० वाजता तुमची वाट पाहणारी शाळा. तुम्ही इथे आल्यावर तुमच्या ज्ञानात भर घालणारी शाळा. तुमचा दंगा, मस्ती, हसणं, रडणं सगळं अगदी जवळून पाहणारी शाळा. तुम्ही सांयकाळी घरी जात असताना तुमच्याकडे तक लावून बघणारी शाळा. पुन्हा उद्या सकाळी तुम्ही पुन्हा येणार म्हणून तुमची आतुरतेने वाट बघणारी शाळा. तुमच्याविषयी लळा असणारी शाळा.
बाळांनो, खूप वर्षापासून मी इथेच आहे. सुरुवातीला माझ्याकडे दोनच वर्ग-खोल्या होत्या. तरीही मी आनंदीच होते, कारण माझ्याकडे किती वर्गखोल्या आहेत याचे मला काहीच सुखः किंवा दु:ख नाही. परंतु तुमच्यासारखी गोड मुलं माझ्यासोबत असतात. माझ्या अवतीभोवती खेळतात, बागडतात, अभ्यास करतात, आपलं जीवन घडवतात यातच मला आनंद आहे. सुरुवातीला माझ्यासोबत वीस मुले होती आज मुलांची संख्या साडेपाचशेच्या वर गेली. वर्ग खोल्या दोन च्या वीस झाल्या. शिक्षकांची संख्याही वाढली. एक चे दोन शिपाई झाले. खूप आनंद वाटतो हा प्रवास बघून. खूप चांगले वाईट दिवस या प्रवासात बघायला मिळाले.
माझी नजर सगळ्यांवर असते. अगदी तुमच्यासारख्या गोड मुलांपासून मुख्याध्यापाकापर्यंत आणि मोठ्या अलिशान गाडीतून येणाऱ्या संस्थाचालकापर्यंत सुद्धा. जसा एखाद्या कंटाळवाण्या तासाला तुम्हाला कंटाळा येतो. तसा मलाही तुमचा वर्ग शांत बघून खूप कंटाळा येतो. एखाद्या तासाला तुम्ही खूप हुरहुरीने उत्तरे देता. हे बघून खूप आनंद होतो आणि तुम्हा सर्वांच खूप कौतुकही वाटत. तुम्ही मैदानावर गेल्यावर जेव्हा खूप धम्माल करता, हे पाहून माझाही आनंद गगनात मावत नाही. तुम्हाला नेहमी आनंदी बघायला आवडतं बर का मला.
पण बाळांनो, काही गोष्टींच खूप वाईट वाटतं. जेव्हा तुम्ही माझ्या आवारात कचरा टाकता. तुमच्या वह्यांची पाने फाडून माझ्या वर्गात, मैदानात टाकता. काही मुलं तर थुंकतात माझ्या आवारात आणि सगळा परिसर घाण करतात. जर तुमच्यावर कोणी थुंकला आणि तुमच्या अंगावर कचरा टाकला तर कसं वाटेल तुम्हाला? खूप वाईट वाटेल ना?
म्हणून तुम्हाला एकच सांगायचं. माझीही काळजी घ्या. जशी तुमच्या घराची काळजी घेता अगदी तशीच. तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण?’
एवढं बोलून शाळा रडू लागली. आभाळही दाटून आल होत. थोड्याच वेळात पावसाची रिमझिम सुरु झाली. सगळ मैदान आणि शाळा चिंब भिजली. आम्हीही धावत धावत घाटी आलो. आम्हीही भिजलो होतो. पावसाने कि शाळेच्या अश्रूंनी हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.