गुरु पौर्णिमा : मराठी निबंध
गुरु पौर्णिमा : मराठी निबंध | Marathi Essay Guru Pournima
आपल्या जीवनाला योग्य मार्ग दाखवणारा. त्या मार्गावर प्रकाश कसा पडायचा हे सांगणारा. स्वतः आपल्या जागेवरच राहून आपल्या शिष्याला खूप पुढे नेणारा. नि:स्वार्थी पणे समाज घडवणारा समाजसेवक म्हणजे गुरु. अशी गुरूची व्याख्या करायला काहीही हरकत नाही. जुन्या काळात गुरु होते कालांतराने गुरुचे गुरुजी झाले आणि आज या आपल्या गुरुजींचे शिक्षक झाले म्हणजे आपले सर झाले. पण आजही विद्यार्थ्यांना त्याच तळमळीने पुढे नेणारे हे व्यक्तिमत्व तितकेच आदरणीय आहे. गुरूची महती सांगणाऱ्या अनेक कथा भारतीय पुराणांमध्ये उपलब्ध आहेत. पण मी आजच्या काळातली एक कथा तुम्हाला सांगू इच्छितो.
एकदा एका गावतले गुरुजी आपल्या आयुष्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याला भेटायला शहरातील त्याच्या कार्यालयात जातात. भलीमोठी इमारत असते. इमारतीखाली गेटजवळ शिपाई, मोठमोठ्या गाड्या इमारतीखाली लागलेल्या असतात. गुरुजी इमारतीच्या लिफ्ट मधून इमारतीच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर असलेल्या आपल्या विद्यार्थ्याच्या कार्यालयात प्रवेश करतात. अतिशय प्रशस्त असं कार्यालय पाहून गुरुजी खूप प्रभावित होतात. खूप अभिमान वाटतो गुरुजींना आपल्या विद्यार्थ्याचा. गुरुजी येताच मुलगा आपल्या खुर्चीवरून उठतो आणि आपल्या गुरूंना नमस्कार करतो. गप्पा गोष्ठी होतात. हितगुज होतं आणि गुरुजी आपल्या निरोप घेतात. गुरुजींचा शिष्य आपल्या गुरूंना सोडायला खालच्या मजल्यावर येतो. निघता निघता गुरुजींना वाटतं कि चला आपल्या या शिष्याची परीक्षा घ्यावी. ते आपल्या या विद्यार्थ्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारतात, “मला सांग तुझ्या मते आज मोठं कोण आहे?” गुरुजींना वाटतं कि कदाचित मुलगा सांगेल कि गुरुजी तुम्ही मोठे आहेत. पण हा विद्यार्थी म्हणतो, “गुरुजी मी मोठा माणूस आहे आज?” गुरुजी निराश होतात आणि निघतात. काही पाऊले पुढे जातात. गेट जवळ पोहचतात आणि न राहून पुन्हा तोच प्रश्न विचारतात. पण या वेळेस उत्तर वेगळं होतं. यावेळेस मुलगा म्हणतो, “गुरुजी आता तुम्ही श्रेष्ठ, आता तर तुम्ही मोठे.”
गुरुजींना आश्चर्य वाटत गुरुजी विचातात, “आता उत्तर कसं बदललं?” मुलगा म्हणतो, “गुरुजी मघाशी मी मोठा होतो कारण मघाशी तुम्ही जेव्हा मला प्रश्न केला तेव्हा तुमचा हात माझ्या खांद्यावर होता आणि आता तर तुम्हीच श्रेष्ठ कारण आता तुमचा हात माझ्या खांद्यावर नाही.”
या गोष्टीतून नक्कीच योग्य अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल… धन्यवाद…!