लहूजी राघोजी साळवे
महाराष्ट्रातील युवकांमध्ये मातृभूमीच्या रक्षणाची स्फूर्ती देणारे, स्वातंत्र्याची ज्योत भारतातील तरुणांमध्ये पेटवून त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तयार करणारे लहूजी राघोजी साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ साली पुणे जिल्ह्यात झाला. त्यांच्या गावाचे नाव भिवडी – पेठ. क्रांतीची, स्वातंत्र्याची, युद्धाची आणि लढण्याची प्रेरणा त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाली. राघोजी हे पेशव्यांच्या काळात शिकारखान्याचे प्रमुख होते .पेशव्यांच्या काळात बंदूक चालवणारी पहिली व्यक्ती म्हणजे लहूजी राघोजी साळवे यांचे वडील राघोजी! वडिलांकडून आलेला क्रांतीचा वारसा त्यांनी पुढील पिढीकडे देण्याचा प्रयत्न केला. इंग्रज सैन्याविरुद्ध लढताना लहूजी राघोजी साळवे यांचे वडील राघोजी यांना वीरमरण आले. हे पाहून लहूजी साळवे यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेतली. यासाठी ते आजन्म ब्रम्हचारी राहिले. लहूजी साळवे यांच्या कुटुंबीयांनी पुरंदरच्या संरक्षणाची जबाबदारी प्राणपणाने आणि प्रामाणिक पाणे पार पडली होती म्हणून त्यांच्या घराण्यास राउत ही पदवी मिळालेली.
स्वातंत्र्य लढ्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन लहूजी साळवे यांनी पुण्यात १८२३ मध्ये व्यायामशाळा सुरु केली. अनेक तरुणांना शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. युद्धशाश्त्राचे शिक्षण दिले. सातारा, सांगली, पुणे, कराड, सोलापुर, पंढरपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील त्या काळातील दरोडेखोर, बंडखोर, भटके विमुक्त, रोमोशी, मांग यासारख्या निडर लोकांना एकत्र करून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली. महात्मा फुले यांनी सुद्धा लहूजी साळवे यांच्याकडून दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. महत्मा फुले यांना मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी ते करीत असलेल्या कार्यात लहूजी साळवे यांनी सहकार्य केले होते.
वासुदेव बळवंत फडके, फकीरा, उमाजी नाईक यांसारख्या महान क्रांतिकारांना प्रशिक्षण आणि प्रेरणा लहूजी साळवे यांनीच दिली होती.
१७ फेब्रुवारी १८८१ रोजी या महान क्रांतीविराचे निर्वाण झाले.