दहावी बारावीचा निकाल मे महिन्यात लागणार!
दहावी बारावीचा निकाल मे महिन्यात लागणार! SSC Board Exam Result 2024
महारष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल या वर्षी लवकरच जाहीर होणार आहे. यावर्षी निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे. बारावी परीक्षेचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. निकाल लवकर जाहीर झाल्यास अकरावी, डिप्लोमा, आयटीआय आणि विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. तसेच यावर्षी या सर्व क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा एक ते २६ मार्च या दरम्यान घेण्यात आली होती आणि बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत पूर्ण झाली होती. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षांचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्यानंतर साधारण आठ-दहा दिवसांत दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.
दरवर्षी बोर्डाच्या परीक्षा झाल्यावर किंवा सुरु असताना पेपर तपासणीसंदर्भात तसेच परीक्षेच्या निकालासंबंधी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु यावर्षी अशाप्रकारच्या कोणत्याही अडचणी आल्या नसल्यामुळे पेपर तपासणीची प्रक्रिया वेळेवर पूर्ण होत आहे तसेच शिक्षकांकडून बारावीच्या परीक्षा प्रक्रियेप्रमाणेच दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यात आले होते त्यामुळे बोर्डाचा बराचसा वेळ येथेही वाचला. उत्तरपत्रिका तपासणीचे काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी समन्वय साधून वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे निकाल तयार करण्याला वेग आला आहे असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
“बारावीच्या च्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या, तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.” -शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ