माझे गाव
'गाव माझं किती सुंदर,
बाजूला सारे हिरवे डोंगर'.
माझे गाव
'गाव माझं किती सुंदर,
बाजूला सारे हिरवे डोंगर'.
किल्लेमच्छिंद्र आणि येडेमच्छिंद्र या दोन्ही डोंगरांनी जोडलेलं माझं सातारा जिल्ह्यातील गाव निसर्गाच्या विविधतेने नटलेलं असुन सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण असे आहे. कराड जवळील ‘शिवनगर’ हे माझे गाव. आजूबाजूला असणा-या अनेक खेड्यांनी आणि वाड्या – वस्त्यांनी वेढलेले आहे. गाव तसे खेडेच पण साखर कारखान्याच्या वसाहतींमुळे त्याला एक नगराचे स्वरुप आले आहे.
साखर कारखान्यांमुळे आमच्या वसाहतींच्या आसपास बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रक यांची नेहमीच वर्दळ असते पण पाण्याच्या मुबलकतेने, ऊसाच्या पिकांमुळे हवाप्रदुषणाचा काहीच त्रास जाणवत नाही उलट हवा नेहमी थंडगार असते. आमच्या गावात एक मराठी शाळा, एक हायस्कूल आणि दोन महाविद्यालये व एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहेत. कारखान्यात काम करणारे लोक आपापल्या हुद्याप्रमाणे आपल्या मुला – मुलींनी शाळेत प्रवेश देतात. हायस्कूल व महाविद्यालय वसाहतीपासून ब-याच उंच अशा पठारावर बांधलेले आहे.
आमच्या गावचा आठवडी बाजार दर मंगळवारी भरतो. बाजारासाठी आजुबाजूच्या खेड्यांतील शेतकरी कृष्णामाईच्या पाण्यावर पिकणारी फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये बैलगाड्यांत भरुन विकायला घेऊन येतात. एका बाजूला मांस – मासे बाजार देखील भरतो. इथे ताजा भाजीपाला स्वस्त आणि मुबलक मिळतो. मुलांना खाऊ, खेळणी मिळत असल्याने बाजारात लहान थोरांची एकच गर्दी असते.
आमच्या गावात ‘गणेशोत्सव’ फार धुमधडाक्यात साजरा होतो. बाजाराच्या विस्तीर्ण पटांगणातील भव्य मंडपात मोठे स्टेज बांधुन गणेशाची स्थापना होते. अकरा दिवस रस्ते, झाडे विद्युतरोषणाईने उजळलेले असतात. रोज सकाळ, संध्याकाळ आरती होऊन घरोघरी प्रसाद वाटला जातो. या दिवसांत इथे रोज नाटक – सिनेमांची खैरात असतेह मुलांचे नृत्य, खेळ आणि बक्षिस शाटप यामुळे सर्व मुले गणेशोत्सवाच्या काळात आनंदात असतात.
गावातील क्रीडाप्रबोधिनी तर्फे निरनिराळे खेळ आणि सामने होतात. यात खो-खो, कबड्डी, क्रिकेट, भालाफेक, निशाणेबाजी अशा विविध खेळांचा समावेश असतो. क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सर्व यशस्वी खेळाडूंचा पारितोषिके, बक्षिसे देऊन गौरव केला जातो. सर्व गरजू व गरीब मुलांना दरवर्षी वह्या – पुस्तकांचे वाटप केले जाते. शाळेत संगणक व खेळांचे सर्व सामान उपलब्ध करुन दिले जाते.
गावातील छत्रपती संभाजी विद्यालयाची इमारत उंचावर व पाच मजली असल्याने दूरवरूनही दिसते अर्धवर्तुळाकार इमारतीच्या एका बाजूला प्रशस्त पटांगण आहे व दुस-या बाजूला विविध झाडे,फुलबाग आहे. मध्यावर सुंदर तळे असून त्यात कमळाची फुले आहेत. बागेत ससे इकडून तिकडे पळत असतात. विविधरंगी पोपट व पांढरीशुभ्र कबुतरे आहेत. बागेच्या दोन्ही कोप-यात दोन पिंजरे आहेत. एकात गरुड तर दुस-यात मोर – लांडोर विसावले आहेत.