बाळशास्त्री जांभेकर – मराठी वृत्तपत्राचे जनक – पत्रकार दिन

बाळशास्त्री जांभेकर – मराठी वृत्तपत्राचे जनक

मराठी वृत्तपत्रांचे जनक’ या उपाधीने ज्यांचा गौरव केला जातो त्या बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर असे होते. लहानपणापासून ते अगदी कुशाग्र बुद्धीचे आणि संशोधक वृत्ती असलेले होते. लहान वयातच त्यांनी संस्कृत, इंग्रजी,  मराठी, गुजराती, बंगाली, फारसी या भाषा आत्मसात केल्या होत्या. त्याचप्रमाणे गणित, भूगोल इत्यादी विषयांमध्येही त्यांनी प्रावीण्य मिळविले होते.

बाळशास्त्री जांभेकरांना लाभलेल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या देणगीमुळे त्यांना ऐन तारुण्यातच अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्य करण्याची संधी मिळू शकली. सन १८३० मध्ये म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षीच जांभेकरांची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ‘डेप्युटी सेक्रेटरी’ म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दोनच वर्षांनी या संस्थेचे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’ म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

पुढे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सरकारच्या वतीने बाळशास्त्रींची नेमणूक झाली. त्या काळात त्यांनी कानडी भाषा शिकून घेतली. त्यानंतर १८३४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची असिस्टंट प्रोफेसर म्हणून ते रुजू झाले. याच कॉलेजात पुढे त्यांनी गणित विषय सुद्धा शिकवला. एल्फिन्स्टन कॉलेजातील ते पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होत. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीचे काम करण्यासाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नेमणूक केली होती. तसेच मुंबई इलाख्यातील पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

मराठी वृत्तपत्राचे जनक

बाळशास्त्री जांभेकरांचे सर्वात महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे पहिले वृत्तपत्र त्यांनी १८३२ मध्ये सुरू केले. ‘दर्पण’ हे साप्ताहिक होते आणि ते इंग्रजी व मराठी अशा दोन भाषांत प्रसिद्ध होत असे. त्याचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रसिद्ध झाला. ६ जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्मदिन आणि याच दिवशी त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुद्धा सुरु केले होते म्हणून ६ जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘दर्पण’ च्या पहिल्याच अंकात जांभेकरांनी असे म्हटले होते की, “स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण यांविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थळ व्हावे या इच्छेने हे वृत्तपत्र सुरू केले आहे.”

वृत्तपत्रांच्या सामर्थ्याविषयी बाळशास्त्रींना यथार्थ जाणीव होती. त्यासंबंधी आपल्या ‘दर्पण’ च्या दुसऱ्याच अंकात त्यांनी असे लिहिले होते की, ‘ही शक्ती आपल्या देशात पूर्वी असल्याचा इतिहासात दाखला नाही. सर्व जगामध्ये पाश्चात्य राष्ट्रांची जी प्रगती झाल्याचे आपणास दिसते, त्याचे प्रमुख कारण म्हणजे वृत्तपत्रे, ज्ञानप्रसाराचे आणि लोकजागृतीचे हे अदभुत साधन आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे, सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, जनतेला तिची कर्तव्ये सांगणे, राज्यकत्यांच्या हुकूमशाहीला लगाम घालणे हे सामर्थ्य वृत्तपत्रांच्या अंगी आहे. ज्या देशांत वृत्तपत्रांना लोकांच्या मनावर परिणाम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे ते देश खचितच धन्य होत!’

दर्पण हे वृत्तपत्र सुमारे आठ वर्षांहून अधिक काळ लोकजागृतीचे आपले कार्य नेटाने पार पाडीत राहिले, २६ जून, १८४० रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

समाजसुधारणेचे कार्य

‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ यांमधील जांभेकरांच्या लेखांवरून त्यांचा समाजसुधारणेविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. आपल्या समाजाचे मागासलेपण दूर व्हावे आणि त्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी, अशी त्यांची तळमळ होती. भारतात इंग्रजी सत्तेची झालेली स्थापना आणि त्यानंतर भारतीय समाजात होऊ घातलेले परिवर्तन या घडामोडींचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले होते. त्यावरून त्यांची अशी खात्री पटली होती की, आपल्या समाजाची प्रगती होण्यासाठी आपण पाश्चात्त्य विद्या आत्मसात केली पाहिजे. ज्ञान व विज्ञान यांच्या प्रसारावर भर दिला पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथांचा त्याग करण्याची तयारी आपण होऊन दर्शविली पाहिजे.

त्यांच्या या विचारांतूनच त्यांनी समाजसुधारणेचा पक्ष घेतला होता. भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात, किमान त्यांना आळा बसावा, अशी त्यांची मनोभूमिका होती. त्यामुळे विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. आपल्या लोकांच्या मनावरील परंपरागत विचारांचा पगडा दूर व्हावा, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विधवाविवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. त्याकरिता गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयींचा एक ग्रंथ लिहवून घेतला. अर्थात, समाजसुधारणेच्या बाबतीत जांभेकरांनी पुनरुज्जीवनवादी सुधारणावाद किंवा परंपरानिष्ठ परिवर्तनवाद यांवरच भर दिला होता. तत्कालीन समाजाचा कर्मठपणा विचारात घेता ते योग्यही होते.

वयाच्या चौतिसाव्या वर्षी १७ मे, १८४६ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचे अकाली निधन झाले.