चरित्र

सावित्रीबाई फुले | सावित्रीबाई फुले निबंध | सावित्रीबाई फुले माहिती | Savitribai Phule

सावित्रीबाई फुले | Savitribai Phule

जन्म – ३ जानेवारी १८३१

मृत्यू – १० मार्च १८९७

विद्येविना मती गेली | मतीविना नीती गेली |

नितीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |

वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||

असे महात्मा जोतीबा फुले यांचे म्हणणे होते. म्हणून मनुष्याच्या जीवनात शिक्षण फार महत्वाचे आहे. म्हणून माणसाने शिक्षणाचा पाठपुरावा करायला पाहिजे. स्त्रियांना, शूद्रांना शिक्षण देवून त्यांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायला हवे. असे ठाम मत महात्मा फुले यांनी मांडले आणि त्याचा पाठपुरावा केला. या महान कार्यात सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे काम केले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे आहे.

एकोणिसाव्या शतकामध्ये अज्ञानाच्या आणि गुलामगिरीच्या अंधकाराच्या पाशातून सोडवणारी व शैक्षणिक प्रबोधन चळवळ सुरु करणारी बहुजन समाजाला आणि स्त्रियांना जीवनाचा योग्य मार्ग दाखवून देणारी एक क्रांतिकारी स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील ‘नायगाव’ या छोट्याश्या गावात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे – पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई. त्यांना एक बहिण आणि तीन भाऊ सुद्धा होते आणि या सर्वांमध्ये सावित्रीबाई मोठ्या होत्या. सावित्रीबाई दिसायला आईसारख्या सुंदर आणि वडिलांसारख्या धिप्पाड होत्या. लहानपणापासूनच सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तीमत्वात स्वाभिमान दिसत होता, अन्यायाविरुद्ध चीड सुद्धा त्यांच्या व्यक्तीमत्वात दिसून येत होती. अन्यायाचा प्रतीकार करायला हवा विचार त्यांच्या मनात जणू भिनला होता.   

लहान असताना सावित्रीबाई त्यांच्या गावातल्या मंदिराजवळ उभ्या होत्या. एक लहान मुलगा त्या मंदिराच्या दरवाजाजवळ उभा होता. त्याच्या हातात एक सुंदर फुल होतं. इतकं सुंदर की ते फुल कोणालाही आवडेल. या सुंदर फुलासोबत ते लहान मुल खेळत होत. अचानक तिथे एक मोठा मुलगा आला आणि त्याने या लहान मुलाच्या हातातील फुले हिसकावून घेतले. बिचारा लहान मुलगा ओरडू लागला, रडू लागला. हे सर्व सावित्रीबाई बघत होत्या. सावित्रीबाई थेट त्या मोठ्या मुलाकडे गेल्या जो मुलगा सावित्रीबाई यांच्यापेक्षा सुद्धा वयाने मोठा होता. या मुलाला सावित्रीबाई यांनी जाब विचारला, “का घेतलस या लहान मुलाच्या हातातून फुल?” त्या मुलानेही प्रत्युत्तर केले. “मला विचारणारी तू कोण?” सावित्रीबाई मोठ्याने त्या मुलाला ओरडल्या आणि म्हणाल्या, “मी त्याची बहिण आहे.” आणि सावित्रीबाईनी ते फुल हिसकावून घेतले आणि त्या लहान मुलाच्या हातात दिले. अशा सावित्रीबाई निर्भीड होत्या.

सन १८४० मध्ये सावित्रीबाई फुले यांचा विवाह जोतीबा फुले यांच्यासोबत झाला. सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्यात त्यांना मनापसून साथ दिली. स्त्री-शिक्षण, मागासवर्गीयांसाठी शाळा, बालहत्या प्रतिबंध, अनाथ बालकांचे संगोपन यांसारख्या कामात त्यांनी जोतिबांना मोलाची साथ दिली.

महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. या शाळेत अनुसूचित जातीच्या मुलीही शिकत असत. स्त्रिया आणि अनुसूचित जाती यांना शिक्षण देणे हा त्या काळातील सर्वात मोठा आणि अक्षम्य असा गुन्हा होता. त्यामुळे या कार्यांत जोतीबा फुले यांना मोठा विरोध झाला. अशा या मुलींच्या शाळेत शिकवण्यासाठी त्यांना शिक्षकही मिळेना तेव्हा जोतीबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं. पुढे सावित्रीबाई फुले या शाळेत शिक्षिका म्हणून मुलींना शिकवू लागल्या. त्यांना पहिल्या भारतीय महिला शिक्षिका म्हणता येईल.

सावित्रीबाई फुले यांच्या या कामामुळे त्या काळात त्यांची खूप अवहेलना झाली. काही लोकांनी तर त्यांच्यावर चिखल फेकण्याची आणि दगड मारण्यापर्यंत मजल मारली. परंतु तरीही सावित्रीबाई फुले यांनी माघार घेतली नाही. त्यांनी आपले काम जोमाने सुरु ठेवले.

पुढे २८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीरावांचे निधन झाले. परंतु त्यांच्या मृत्युनंतरही सावित्रीबाईंनी जोतिबांचे काम पुढे सुरु ठेवले.

सावित्रीबाई फुले यांचे हे कार्य पाहता एकोणिसाव्या शतकात समाजातील दिनदुर्बल घटकांसाठी इतके महान कार्य करणारी दुसरी स्त्री झाली नाही असेच म्हणावे लागेल.  महाराष्ट्रातील स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या त्या खऱ्या अर्थाने अग्रणी होत्या.